दुकान बंद असताना चोरट्यांचा डाव; लोहेगावमध्ये 53 हजारांची चोरी
पुणे | लोहेगाव : लोहेगाव परिसरातील धानोरी येथील जकात नाका परिसरात असलेल्या महादेव हार्डवेअर दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. दुकान बंद असताना अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि रोकड तसेच इलेक्ट्रिकल वायर असा एकूण सुमारे 53 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 10.30 वाजल्यापासून 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली.
फिर्यादीचे हार्डवेअर दुकान बंद असताना अज्ञात व्यक्तीने दुकानाचे वरील पत्रे उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील 1,000 रुपये रोख रक्कम आणि पॉलीकॅब वायर असा एकूण 53,000 रुपयांचा ऐवज चोरी करून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी लोहेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 273/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
