महात्मा फुले जन योजना आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत येणाऱ्या शासनमान्य हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आरोग्य मित्रांनी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेमार्फत (सी आय टी यु संलग्न) त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे तळागाळातील गोरगरिबांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी ही योजना जिल्ह्यात राबवली. सदरची योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फेतीन खाजगी आस्थापना नियुक्त केल्या आहेत. त्यामधील एमडी इंडिया यांच्यामार्फत सातारा जिल्ह्यात ही योजना राबवली जाते. यासाठी आरोग्यमित्र ची नेमणूक केली जाते. आरोग्यमित्र हे रुग्ण व रुग्णालय यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. रुग्णांच्या कागदपत्राची पूर्तता करणे, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेणे, त्यांना सर्व सेवांचा लाभ उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांना डिस्चार्ज देणे, या सर्व जबाबदाऱ्या आरोग्यमित्र पार पाडत असूनही शासन यांच्या बाबतीत कायमच उदासीन दिसून येत आहे.
महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना व एमडी इंडिया यांच्यामध्ये दि. 7 फ्रेबुवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीत संघटनेच्या सर्व मागण्या येत्या १० दिवसात मान्य केल्या जाईल ,असे आश्वासन देऊन देखील अद्यापही कोणतीच मागणी मान्य न झाल्याने संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले. सदर मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्र संपावर जातील असा गंभीर इशारा संघटनेचे वतीने देण्यात आला आहे.
यामध्ये प्रामुख्याने सर्व आरोग्य मित्रांना रुपये सव्वीस हजार वेतन देण्यात यावे, किमान वेतन कायद्यानुसार महागाई भत्ता देण्यात यावा, दरवर्षी वेतनवाढ दहा टक्के करण्यात यावी, आरोग्यमित्रांना पेट्रोल भत्ता देण्यात यावा, आरोग्य मित्रांचे इतर जिल्ह्यात बदलीचे ठिकाण रद्द करावे, त्याचबरोबर आजारपणाच्या १०किरकोळ रजा १०विशेष रजा 30 व सणांच्या रजा १० लागू करण्यात याव्या, तसेच जे आरोग्य मित्र 2018 पासून विनावेतन काम करत आहेत त्यांना मोबदला व नियुक्तीपत्र देण्यात यावे, सदर नियुक्ती पत्रावर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहेत. सदर मागण्या मान्य न झाल्यासदिनांक 18 फेब्रुवारी 2025 पासून सर्व आरोग्य मित्र संपावर जातील असा गंभीर इशारा संघटनेच्या वतीने शासनास तसेच एमडी इंडिया या खाजगी आस्थापनेस देण्यात आला आहे.
