छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली – उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये मावळ्यांना एकत्र करून रयतेसाठी स्वराज्य स्थापन केले आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श निर्माण केला. त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला जाग आणली आणि दिल्लीच्या तख्तालाही आव्हान देण्याची हिंमत दाखवली. त्यांच्यामुळे महाराष्ट्राला अभिमानाने जगण्याची ताकद मिळाली, असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त काढले.
अजित पवार म्हणाले की, गेल्या चार शतकांपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यांच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमामुळे महाराष्ट्राची ओळख टिकून आहे. महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावर महाराष्ट्राची वाटचाल आजही सुरू असून भविष्यातही तशीच राहील, असे ते म्हणाले.शिवजयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांच्या विचारांचा जागर करण्याचे आवाहन केले.
