शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार – पुण्यात खळबळ
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वारगेट एसटी बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडला आहे. पहाटेच्या वेळी अंधाराचा फायदा घेत एका नराधमाने तिच्यावर जबरदस्ती केली आणि पसार झाला. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
काय घडले नेमके?
ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. संबंधित तरुणी पुण्यातून फलटणकडे जाण्यासाठी निघाली होती. स्वारगेट एसटी स्थानक परिसरात आल्यावर एका अनोळखी व्यक्तीने तिला “फलटणकडे जाणारी एसटी दुसऱ्या ठिकाणी उभी आहे” असे सांगितले. मात्र, तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला.तरीही, त्या व्यक्तीने तिच्या मनात संभ्रम निर्माण केला आणि एका अंधाऱ्या जागी उभ्या असलेल्या शिवशाही बसकडे नेले. बस बंद असल्याचे तिने सांगितले असता, त्याने “टॉर्च लावून बघ, हीच गाडी आहे, लवकरच सुटेल” असे सांगितले. ती बसमध्ये शिरताच, त्या नराधमाने तिच्यावर जबरदस्ती केली आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेला.
पोलिसांची तपासणी सुरू
या घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांची वेगवेगळी पथके आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे. एसटी स्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत, आणि लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
