कालवा दुरुस्तीसाठी कामाला लागा-आमदार सत्यजित देशमुख
कुसळेवाडी ता. शिराळा येथे वारणा डावा कालव्यास गळती लागून मोठ्या प्रमाणात खचला आहे. याठिकाणी आमदार सत्यजित देशमुख यांनी प्रत्यक्ष पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. तत्काळ दुरुस्तीचे काम चालू करण्याच्या सूचना यांत्रिकी विभागाला दिल्यानंतर लगेच दुपारनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हा कालवा खचल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. १९८० साली मातीकाम पूर्ण झालेल्या कालव्यास गळती लागली होती. कालवा जिरल्याने मोठी गळती लागली.कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. प्रत्यक्ष या ठिकाणी जाऊन आमदार सत्यजित देशमुख यांनी पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कालवा दुरुस्तीच्या सूचना दिल्या. त्यानुसार यांत्रिक विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे.
आमदार देशमुख म्हणाले, कालव्यास गळती लागल्यामुळे व पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने मातीचा कालवा जिरला आहे. पाण्याच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात शेती व पिकांचे नुकसान झाले. कालवा दुरुस्तीच्या सूचना यांत्रिकी विभागाला दिल्या असून गतीने काम पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी मिलिंद किकवाटकर, अनिल लांडगे, यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे, सर्जेराव मस्कर, मधुकर कुसळे, उपसरपंच संजय सोडुलकर, बाळू कुसळे, बाबा मस्कर, सुनील मस्कर व पदाधिकारी उपस्थित होते.
