पोलीस दलातील उत्तम बर्गे यांचे काम आदर्शवत – पोलीस अधीक्षक समीर शेख
कराड: प्रामाणिकपणा, विश्वास याला प्राधान्य देत कामाची गतीमानता, निर्णयक्षमता आणि आपल्या कामाला आनंद मानण्याची वृत्ती जोपासताना कराड गुन्हे शाखा विभागातील पोलिस उपनिरीक्षक उत्तम पांडुरंग बर्गे यांनी पोलिस दलात निष्कलंक काम करून आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले.
कराड येथील गुन्हे शाखा विभागातील पोलिस उप निरीक्षक उत्तम बर्गे यांच्या पोलीस दलातील सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर गृह विभागाचे पोलिस उप अधीक्षक अतुल सबनीस, आ. डॉ अतुल भोसले यांचे स्विय सहाय्यक फत्तेसिंह सरनोबत,सौ.अनिता उत्तम बर्गे, डॉ. लक्ष्मणराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर म्हणाल्या, पोलीस दलातील शिस्त जोपासत उत्तम बर्गे यांनी अनेक नियोजनांची जबाबदारी घेत निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी केली. निवृत्तीनंतर पोलीस दलातील काम थांबू नये यासाठी त्यांनी आपल्या कामाचे इतरांना प्रशिक्षण दिले. त्यांनी केलेली कर्तव्य पूर्ती अभिमानास्पद आहे.
या प्रसंगी उत्तम बर्गे यांनी सत्काराला उत्तर देताना ३७ वर्षे पोलीस दलात केलेल्या कामाचा आढावा घेऊन कुटुंबातील सदस्य तसेच वरिष्ठांच्या मिळालेल्या सहकार्यामुळेच निष्कलंक सेवावृत्ती जोपासली असल्याचे नमूद केले.यावेळी पोलीस उपअधीक्षक गृह अतुल सबनीस, उत्तम बर्गे यांच्या सुविद्य पत्नी सौ.अनिता बर्गे, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक सतीश साबळे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास सातारा जिल्हा गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनचे अध्यक्ष नंदकुमार काटे, डॉ.सौ. प्रगती कदम, डॉ. प्रेषित कदम, उदयसिंह भोसले, सुजित कदम, सलीम मुजावर, सुरजित हंसपाल तसेच सातारा, कराड पोलीस दलातील कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते उत्तम बर्गे यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार केला.
