छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक बोलणाऱ्या व्यक्तीस १० वर्षे शिक्षेचा कायदा करावा- छ.उदयनराजे भोसले
सातारा: औरंगजेब हा देश लुटावयास आला होता त्यामुळे त्याचे उदात्तीकरण करण्याची गरज नाही असे उदगार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत काढले. तसेच ज्यांना औरंगजेबाबाबत प्रेम वाटते त्यांनी खुशाल देश सोडून जावे असेही ते म्हणाले. औरंगजेबाची कबर जेसीबी लावून खोदण्यास वेळ लागणार नाही,असा गंभीर इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम हा भेदभाव कधीच केला नाही त्यांच्या सैन्यदलामध्ये महत्त्वाच्या हुद्द्यावर मुस्लीम व्यक्ती तैनात केल्या होत्या. तसेच त्यांच्या अंगरक्षका मध्ये सुद्धा मुस्लिम व्यक्तींचा समावेश होता.
यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले कमालीचे आक्रमक झाले होते .त्याचबरोबर सध्या सुरू असलेली औरंगजेबाच्या उदात्तीकरणाची चीड खासदार उदयनराजे भोसले यांच्या नजरेतून व देह बोलीतून स्पष्ट जाणवत होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक बोलणाऱ्या व्यक्तीस १० वर्ष शिक्षेचा कायदा अधिवेशनात मंजूर करण्यात यावा, असे जलमंदीर येथील पत्रकार परिषदेत बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
