महत्त्वाच्या बातम्या

महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

दौलतनगर : सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांमध्ये पिक उत्पादन, प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, पशुधन संवर्धन तंत्रज्ञान यांतील नवीन आणि आधुनिक माहिती व ज्ञान यांची देवाण-घेवाण होण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यात डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या डोंगरी महोत्सवाच्या नियोजनाबाबत आज पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी दौलतनगर (ता. पाटण) येथे आढावा बैठक घेतली. 

    या डोंगरी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांना सहभागी करून घ्यावे, अशी सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी केली. तसेच कृषी प्रदर्शन व पशुपक्षी प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करावे. हे प्रदर्शन भव्यदिव्य होण्यासाठी विविध विभागांनी समन्वयातून काम करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर परजिल्ह्यातील डोंगरी भागातील महिला बचतगटांना या डोंगरी महोत्सवामध्ये आमंत्रित करावे व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व मालाच्या विक्रीकरिता स्टॉल्स उपलब्ध करून द्यावेत.

    शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून देणाऱ्या स्टाल्सचीही उभारणी करण्यात यावी, असेही निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले. या डोंगरी महोत्सवात जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होतील यादृष्टीने कृषी विभागाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

    या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!