महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या – गावात तणावाचे वातावरण

 जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावात शुक्रवारी सकाळी एका धक्कादायक घटनेत माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. हल्ला करणारे तिघेजण फरार झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

     शुक्रवारी सकाळी साधारण आठच्या सुमारास गावातील तिघांनी युवराज कोळी यांच्यावर चाकू व कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

    युवराज कोळी हे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी उपसरपंच होते. त्यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काहीजण ही हत्या राजकीय वादातून झाल्याचे सांगत आहेत, तर काहींनी वैयक्तिक वाद असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

    या घटनेमुळे कानसवाडा गावासह जळगाव शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. मृताच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयाबाहेर आक्रोश व्यक्त केला आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!