शिरवळ पोलीस स्टेशन शांतता कमिटी व दक्षता समितीची बैठक संपन्न
शिरवळ पोलीस स्टेशन व महिला दक्षता व शांतता कमिटी सदस्यांची बैठक शिरवळ येथे संपन्न झाली.सदर बैठकीत महिलांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या व त्या सोडवण्यासाठी काय उपाय योजना करता येईल यावर चर्चा करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसां बरोबर राहून काम करण्याचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्यां अंबिका देशमाने, डॉ.धुमाळ, उज्वल तांबे, हेमलता शेटे, सीमा पवार, पार्वती बिराजदार, वैशाली नेवसे, छाया माळवे, सीमा तावडे, आदर्श विद्यालय मुख्याध्यापिका यादव, तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
सदर बैठकीनंतर महिलांनी पोलिसांसोबत शिरवळ बाजारपेठ रस्त्याने चालत पेट्रोलिंगचा अनुभव घेतला. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर, मोबाईलवर बोलत गाडी चालवणारे तसेच ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात पोलिसांना मदत केली. महिलांनी भविष्यातही वाहतूक व्यवस्थापन व पोलिसी कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली. कायदा-सुव्यवस्थेच्या प्रक्रियेत महिलांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या सक्रीय सहभागामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होईल,असे बैठकीतील सदस्यांनी आपले मत मांडले.
शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी महिलांच्या या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.महिलांचा सहभाग केवळ बैठकीपुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्यास समाजात सकारात्मक बदल घडवता येईल,असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. पोलिसांच्या वतीने महिला दक्षता कमिटीला आवश्यक त्या सर्व सहकार्याची ग्वाही त्यांनी दिली.
