श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कृष्णा नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आज अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व सेवा केंद्र मार्ग (दिंडोरी प्रणित) केंद्र कृष्णा नगर सातारा यांच्यामार्फत मोठ्या भक्ती भावाने श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर कृष्णा नगर येथे पार पडला. उत्सवाचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून कृष्णा नगर केंद्रप्रमुख तन्मय नवले गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्राच्या भूमीला संत महात्म्यांची परंपरा आहे ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, संत चोखामेळा,जनाबाई अशा अनेक थोर विभूती होऊन गेल्या. त्यांच्या सहवासाने महाराष्ट्राची भूमी पावन झाली आहे. त्यांच्याच विचारधारांवर अध्यात्माची कास धरून 21व्या शतकातील भक्त मार्गक्रमण करीत आहेत. श्री स्वामी समर्थ हे यापैकी एक थोर विभूती अनेक रंजल्या गांजलेल्या लोकांना आपल्या जवळ घेऊन मायेचा झरा त्यांनी दिला. या अध्यात्मिक केंद्रामार्फत श्री समर्थांची शिकवण सर्वसामान्य रंजल्या गांजल्या लोकांपर्यंत रुजवण्याचे काम केले जाते. तसेच शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात या आध्यात्मिक केंद्राचे भरीव योगदान असते.याप्रसंगी बोलताना केंद्रप्रमुख तन्मय नवले यांनी सांगितले की, आजच्या २१ व्या शतकात आपण भौतिक सुखाच्या मागे धावत आहोत त्यामुळे आपण आपल्या हातातला आनंद गमावला आहे.आणि तो आनंद आपण बाहेर शोधत आहोत परंतु श्री समर्थांच्या सेवेमुळे हा आनंद आपल्या अंतरंगात आहे याची जाणीव होते अहंकाराचे पाश गळून पडतात. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीस आपण माफ करण्याचे सामर्थ्य अंगी येते व जगण्याचे बळ मिळते. आज अनेक वर्षानंतर सुद्धा या संतांच्या शिकवणीची गरज आज आपल्याला पडते.
केंद्र प्रमुख तन्मय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये होम हवन श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 21 अध्याय वाचन हवनयुक्त स्वाहाकार तसेच 11 माळीस्वामी समर्थ जप इत्यादी कार्यक्रम पार पडले तर नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास केंद्रातील महिला व पुरुष , सेवेकरी परिसरातील नागरीक यांनी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
