जिल्हयातील खाजगी व धर्मादाय हॉस्पिटलचे बिल आकारणीचे पर्यवेक्षण ऑडीट करण्याची मागणी
पुणे: जिल्हयातील खाजगी व धर्मादाय हॉस्पिटलचे बिल आकारणीचे पर्यवेक्षण ऑडीट करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे माजी सभापती शरद विटे पाटील प्रमोदकाका काकडे, तसेच वीरधवल जगदाळे प्रताप पाटील, यांनी पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि चर्चा केली.
पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन आपल्या आरोग्य विभागात केले जाते. तर अनेक हॉस्पिटल रजिस्ट्रेशन न करताच सुरु आहेत. या सर्व हॉस्पिटलकडून अनेकदा पेशंटला अवाजवी बिले आकारली जातात. काहीवेळा पैसे नाहीत म्हणून रुग्णांना उपचार नाकारले जात असल्याचे त्यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणले आहे. ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नागरिकांचे याबाबतचे अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन असावी.
उपचार आणि बिलासंबंधी येणारे तक्रारीचे निवारण करणे, बिलाचे ऑडीट करणे याबाबत प्रशासनाची एक समिती असली पाहिजे. अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन कालमर्यादत कार्यवाही व्हायला पाहिजे. गरज नसलेल्या औषधे रुग्णांना खरेदी करायला लावली जातात. तक्रार येईल अशा मेडिकल बिलांची देखील तपासणी करण्याची व्यवस्था करावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत देखील अनेक हॉस्पिटल रुग्णांना उपचार नाकारतात किंवा खूप वेळ लावतात याबाबत देखील आपण काही उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे.
