सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनविणार : खा. नितीनकाका पाटील
सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचाराचा आहे. आता बेरजेचे राजकारण करून सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनविणारा असे प्रतिपादन खा. नितीनकाका पाटील यांनी दहिवडी येथील अनिल देसाई संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. यावेळी माण तालुकाध्यक्ष युवराज सुर्यवंशी, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे, किसन वीर साखर कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण, जालिंदर खरात, लक्ष्मण सुर्यवंशी, बाळासाहेब कदम, रफीक मुलाणी, दाजीराम पवार, समीर ओंबासे आदी मान्यवर उपस्थित होते.
नितीन पाटील, सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी काम करत आला आहे. त्याच विचारांचे सर्व कार्यकर्ते एकत्र करून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणे उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच भाग म्हणून मी आज अनिल देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एकमेकांची भूमिका समजून घेतल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे.
अनिल देसाई म्हणाले, पुढील राजकीय वाटचाली संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासंदर्भात आजची बैठक होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी अजित पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांचा स्वभाव, त्यांची कामाची तसेच कार्यकर्त्यांना ताकद देण्याची पद्धत मला माहिती आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून ते देतील त्या तारखेला आम्ही जाहीर प्रवेश करणार आहोत. आम्ही सर्व मिळून माण तालुका राष्ट्रवादीमय केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी माण तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.
