दुर्गम निवळीतील सृष्टी निवळेचे राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत दमदार यश
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम कांदाटी खोऱ्यातील निवळी या छोट्याशा गावातून पुढे आलेल्या सृष्टी हरिश्चंद्र निवळे हिने राष्ट्रीय पातळीवरील डॉजबॉल स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.सध्या कल्याण येथे वास्तव्यास असलेली सृष्टी हिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून, शिक्षणाबरोबरच डॉजबॉल आणि हँडबॉलसारख्या खेळांमध्येही उत्कृष्टता साधली आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लबमधून प्रशिक्षण घेत, तिने मुंबईतील राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी केली आणि तिची निवड महाराष्ट्र राज्य संघात झाली.
राष्ट्रीय डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने केरळ येथे आयोजित १७व्या नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिपमध्ये, सृष्टीने महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात खेळून तृतीय क्रमांक मिळवण्यात मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून राज्याचा झेंडा उंचावला.सृष्टीच्या खेळातील ऊर्जा, चिकाटी, आत्मविश्वास आणि संघभावना ही तिच्या यशामागील खरी ताकद ठरली आहे. या यशामध्ये तिच्या प्रशिक्षक कोच निशांत गायकवाड यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. तसेच मॅथ्यू पॉल सर यांचे शैक्षणिक मार्गदर्शन व तिच्या शाळेचे पाठबळ हेही तिच्या यशाचे आधारस्तंभ ठरले.
सृष्टी ही श्री. हरिश्चंद्र व सौ. सुरेखा निवळे यांची कन्या असून, सीमित संसाधनांतून पुढे येत तिने मोठे यश मिळवले आहे.
या घवघवीत यशामुळे सृष्टीने आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा स्वाभिमान उंचावला आहे.तिच्या या प्रेरणादायी कामगिरीमुळे संपूर्ण निवळी गावात, महाबळेश्वर तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. स्थानिक ग्रामस्थ, कुटुंबीय आणि शिक्षकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
