बॉम्बे रेस्टोरंट परिसर जलमय
बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा सातारचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात तो वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत असतो. या चौकात पुणे, कराड, सोलापूर तसेच सातारा शहरात जाणाऱ्या वाहनांची कायम वर्दळ असते. एवढी वर्दळ असूनही सिग्नल यंत्रणा कार्यरत नाही त्यामुळे अतिगर्दी वेळी वाहतूक पोलीस सुद्धा या जाममुळे हतबल होतात. विशेष म्हणजे या चौकाच्या अलीकडे सातारा नगरपरिषदेची हदद असून पूल ओलांडला असता त्रिशंकू भाग सुरू होतो आणि हायवेच्या दोन्ही बाजूस असणारे सर्विस रोड नॅशनल हायवे अथोरीटीच्या अखत्यारीत येतात. तसेच चौकातील सर्विस रोड जबाबदारी त्यांचीच असून नॅशनल हायवे ॲथॉरीटी याबाबत कोणतीच कायमस्वरूपी उपाययोजना करत नाही. चौकातील गटारे पुर्णपणे मुजलेली असून यामुळे थोड्या पावसात चौक जलमय होतो व ती पाण्याची पातळी २ ते 3 दिवस तशीच राहते. या मध्ये अनेकवेळा दुचाकी पडतात तसेच पाणीपातळी जास्त असल्यास इंजिनमध्ये दुचाकी बंद पडून वाहनांचे नुकसान होत आहे. वारंवार अशा घटना घडूनही प्रशासन या बाबतीत नेहमी प्रमाणे ठिम्म असून नागरीक त्रस्त आहेत.
