बोगदा ते कास पठार मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात
ऐन मे महिन्यात अचानक निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील लोकांनी प्रचंड पाऊस अनुभवला. या मध्ये शेतकऱ्यांचे, नागरिकांचे हाल व नुकसान झाले. या पावसाने निसर्गाचे रूपडे पालटले. डोंगर, दऱ्या, ओढे, नदी, नाले तुडुंब वाहू लागले. सर्वत्र हिरवळ पसरली आणि त्यामुळे या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आपोआप कास पठार भागाकडे वळायला लागली परंतु या निर्सगाचा आनंद घेता घेता अनेक पर्यटक मद्यपान करून हुल्लडबाजी करतात. महिलांची छेडछाड काढणे, गोंगाट करणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे, भर रस्त्यात नाचणे, असे अनेक प्रकार घडतात या सर्व बाबींना आळा घालण्यासाठीच नवनियुक्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली बोगदा ते कास पठार या मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री अप रात्री सुद्धा वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. ऐन मे महिन्यातच ठोसेघर व भांबवली धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. त्याचबरोबर कास तलावाच्या पाणीपातळीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ही पूर्वतयारी केली आहे.
