महत्त्वाच्या बातम्या

एकपात्री कला आणि कलाकारांचे भविष्य उज्ज्वल-डॉ. सतीश देसाई, अध्यक्ष, पुण्यभूषण फाउंडेशन

पुणेः विभक्त कुटुंब पध्दती आणि समाज माध्यमांच्या प्रभावामुळे माणसांचा एकमेकांबरोबरचा संवाद खुंटला आहे. दिवसागणिक संवादाची भूक वाढत असताना व्यक्ती-व्यक्ती आणि कुटुंबातील संवादाच्या अभावाची ही पोकळी एकपात्री कलाकारच भरून काढू शकतो. त्यामुळे एकपात्री कला आणि कलाकारांना उज्ज्वल भविष्य आहे, असे मत पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी व्यक्त केले.  मराठी रंगभूमीवर एकपात्री कलाप्रकार रुजवणाऱ्या पहिल्या पिढीतील जेष्ठ एकपात्री कलाकार मधुकर टिल्लू यांच्या रौप्य महोत्सवी स्मृतीदिनानिमित्त एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्यावतीने आयोजित विविध कला महोत्सवाचे उद्घाटन आज पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. नटराज पूजन आणि मधुकर टिल्लू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाचे उद्घाटन झाले. निळू फुले कला अकादमीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर एकपात्री कलाकार परिषदेच्या उपाध्यक्ष मंजुषा जोशी आणि प्रसिध्द एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू आदी मान्यवर उपस्थित होते.                                                                     यावेळी अंजली शहा यांना आर्टिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कथाकथन स्पर्धा आणि एकपात्री स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. सतीश देसाई म्हणाले की, समाजातील विविध क्षेत्रांमध्ये घराणेशाही दिसून येते. एकपात्री क्षेत्रात चांगल्या अर्थाने टिल्लू कुटुंबाने त्यांची तिसरी पिढी याच क्षेत्रात प्रस्थापित करून समाजासमोर घराणेशाहीचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. मधुकर टिल्लू यांच्या एकपात्री कलेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार असून त्यांनी एकपात्री कला क्षेत्रात सुवर्णकाळ तयार केला होता. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे निस्सीम चाहते होते. त्यांच्या एका एकपात्री ध्वनीमुद्रिकेच्या अनावरणाचा कार्यक्रम बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः आयोजित करून टिल्लू यांच्या कलेला दाद दिली होती. राजकीय क्षेत्रातील ताणतणावाखाली असताना बाळासाहेब ठाकरे टिल्लू यांची शायरी आणि विनोदी किस्से ऐकून ताजेतवाने होत असत.              

         यावेळी प्रसिध्द एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. एकपात्री कलाकार परिषदेच्या सचिव पल्लवी परब भालेकर यांनी मनोगत व्यक्त केले.”आर्टिस्ट ऑफ द इयर” या पुरस्काराच्या मानकरी अंजली शहा यांनी पुरस्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर डॉ. सतीश देसाई यांनी त्यांच्या ‘आनंद यात्री’ या कार्यक्रमाचा काही भाग सादर केला. तसेच इतर एकपात्री कलाकारांनी कला सादरीकरण केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!