महत्त्वाच्या बातम्या

माणमधील कृषी सेवा केंद्रांची बोगसगिरी; माणमधील तीन कृषी सेवा केंद्रांवर भरारी पथकांची कारवाई

     माण तालुक्यातील बोगसगिरी करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत तीन कृषी सेवा केंद्रांवर तपासणीत त्रुटी आढळून आल्याने दुकानातील विक्री बंद करण्याचे आदेश दिले. भरारी पथकाच्या या कारवाईने बोगस खते व बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. माण तालुक्यामध्ये जिल्हा भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांच्या विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. खते, बियाणे, कीटकनाशके माफक दरात व गुणवत्तापूर्ण शेतकऱ्यांना मिळण्यासाठी जिल्हा पथक प्रमुख कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, मोहीम अधिकारी अशोक मोरे, तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे,माण पंचायत समिती कृषी अधिकारी किरण उदमले यांच्या पथकाने माणमध्ये अनेक 

दुकानात जाऊन खते, बियाणे तसेच कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. बियाण्यांचे रेकॉर्ड न ठेवणे, दर फलक न लावणे, रजिस्टर वेळेत न भरणे यासह अनेक त्रुटी आढळलेल्या तीन विक्रेत्यांवर कारणे दाखवा नोटीस देऊन विक्री बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. तसेच खते व बियाणे यांचे नमुने तपासणीसाठी काढण्यात आले.

 

        दरम्यान, शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी करताना पक्की बिले घ्यावीत. तसेच खता बरोबर इतर कोणत्या ही प्रकारचे लिंकिंग केल्यास माण तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पंचायत समिती दहिवडीचे कृषी अधिकारी किरण उदमले यांनी केले आहे.

 

 कृषी अधिकारी वैभव लिंगे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले

        माण तालुक्याचे कृषी अधिकारी वैभव लिंगे दोन वर्ष कारवाया करण्यामध्ये अपयशी ठरले होते. दोन वर्षानंतर कारवाया करण्यात त्यांना यश आल्यामुळे चेहऱ्यावरती हसू उमटले आहे. त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव असल्याची चर्चा तालुक्यातून होती. मात्र आताची कारवाई राजकारणातून की प्रामाणिक कार्यातून अशी चर्चा चौका चौकात सुरू आहे.

कारवाई झालेले कृषी केंद्र

१) हिंदुस्थान ट्रेडिंग कंपनी(म्हसवड )

२) श्री गणेश कृषी सेवा केंद्र (म्हसवड )

३) वैभव कृषी एजन्सीज (म्हसवड )

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!