विद्यावाणी कम्युनिटी रेडिओच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओच्या स्थापनेला दिनांक 11 जून 2025 रोजी 20 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त मा. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रा-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. चारुशीला गायके तसेच विविध मान्यवर प्राध्यापक अधिकारी शुभेच्छा दिल्या आहेत.गेल्या वीस वर्षांत विद्यावाणीने कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान -तंत्रज्ञान, समाजकारण, संस्कृती इत्यादी अनेक विषयांवर समुदायाच्या सहभागाने शेकडो कार्यक्रम मालिका प्रसारित केल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या लाखो श्रोत्यांना विद्यावाणीच्या ज्ञान, माहिती व मनोरंजन वर कार्यक्रमांचा लाभ घेता येत आहे अलीकडील काळात मोबाईल ॲपचा वाढता वापर लक्षात घेता विद्यावाणीने देखील आपले मोबाईल ॲप डेव्हलप केले आहे.दररोज सकाळी सात ते रात्री आठ या वेळात सलग तेरा तास प्रसारण सुरू आहे. विद्यावाणीने महाराष्ट्रामध्ये कम्युनिटी रेडिओ चळवळ रुजविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यामध्ये महाराष्ट्रातील कम्युनिटी रेडिओंच्या बैठका व संमेलने विद्यापीठात आयोजित करण्यात आली. याचा फायदा प्रामुख्याने कम्युनिटी रेडिओ ना राज्य शासनाच्या विविध विभागांच्या जाहिराती संघटितपणे मिळवण्यासाठी झाला. तसेच कम्युनिटी रेडिओचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था तसेच कृषी विज्ञान केंद्र यांना विद्यावाणीने मार्गदर्शन केले आणि या प्रयत्नातून महाराष्ट्रात विविध ठिकाणी कम्युनिटी रेडिओ सुरु होण्यात मदत झाली.
या विशेष उल्लेखनीय कार्यांची दखल घेत भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने विद्यावाणी रेडिओला ‘लीड कम्युनिटी रेडिओ’ म्हणून प्रमाणित केले आहे.विद्यावणीच्या या यशामध्ये संकल्पक डॉ. के. आर. सानप , प्रथम संचालिका श्रीमती उष:प्रभा पागे, तसेच यापूर्वीचे संचालक आनंद देशमुख यांचा मोठा वाटा राहिला आहे. यंदाच्या वर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यापीठात कार्यरत कर्मचारी आणि निवडक विद्यार्थ्यांसाठी व्हॉइस कल्चर कार्यशाळा घेण्यात येत आहे.
त्याचबरोबर महिला मुक्ती चळवळीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक कार्यक्रम मालिका सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमालिकेच्या पहिल्या भागाचे रेकॉर्डिंग नुकतेच पूर्ण करण्यात आले. यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉ. नीलम गोऱ्हे यांची एक अभ्यासपूर्ण मुलाखत ध्वनीमुद्रित करण्यात आली. यामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या पाच दशकातील विविध घडामोडींचा आढावा घेण्यात आला. सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. नजीकच्या भविष्यात विद्यावाणी रेडिओ वरून अधिकाधिक लोकांच्या सहभागाने पुणे परिसरातील श्रोत्यांच्या नागरी व सामाजिक समस्यांची उकल करणारे प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रभारी संचालक श्रीदत्त गायकवाड यांनी नमूद केले.
