महत्त्वाच्या बातम्या

वैविध्यपूर्ण, मनमोहक नृत्याविष्कारांनी सजला ‘रज महोत्सव’

पुणे: ‘बनस्ते डाकीला गजा, बरसके थरे आसीची रज’ यावरील ओडिशाचा पारंपरिक नृत्याविष्कार, ‘रंगबती’ लोकनृत्य, एकाच मंचावर सादर झालेल्या भरतनाट्यम, ओडिशी, गौडियो, कथकली, कथ्थक, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, मणिपुरी, सात्रीया अशा वैविध्यपूर्ण, मनमोहक नृत्य नवरत्न कार्यक्रमातून रज महोत्सव सजला. नृत्यांतून उमटलेल्या ह्रदयस्पर्शी भावमुद्रा, नजाकत अन् अभिनयाने उपस्थितांची वाहवा मिळवली. मासिक पाळी आरोग्याबाबत जनजागृती आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी कलिंगा कला केंद्र ट्रस्टतर्फे ओडिशाच्या पारंपरिक ‘रज महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

         बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महोत्सवात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडले. नृत्यांगना व गायिका, कलिंगा कला केंद्र ट्रस्टच्या ममता मिश्रा यांच्या पुढाकाराने आयोजित महोत्सवात वेगवेगळ्या राज्यांच्या पारंपरिक नृत्याचे मिश्रण असलेल्या नृत्य नवरत्न या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. ओडिशा सरकारच्या ओडिया लँग्वेज लिटरेचर अँड कल्चरल डिपार्टमेंटच्या सहकार्याने हा महोत्सव पार पडला. ‘बनस्ते डाकीला गजा, बरसके थरे आसीची रज’ या सामूहिक नृत्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. ओडिशी, गौडीयो, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, कथक, कथकली, मणिपुरी, सात्रीया, भरतनाट्यम नृत्यप्रकार सादर केले. ‘रंगबती’ गाण्यावरील लोकनृत्याने उपस्थितांना ताल धरायला लावला. सर्व महिला कलाकारांना ‘रज क्वीन’चा क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!