महत्त्वाच्या बातम्या

काळ आला होता पण वेळ आली नव्हती; प्रवाशांनी भरलेली बस विहिरीत कोसळता कोसळता वाचली

सांगली: प्रवाशांनी भरून मार्गस्थ झालेल्या बसला अपघात झाला आहे. समोरून आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरून शेतातील विहिरीकडे गेली. सुदैवाने बस विहिरीच्या कठड्याजवळ जाऊन थांबली. अन्यथा बस थेट विहिरीत कोसळली असती. मात्र दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

      सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या येळावी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसला हा अपघात झाला आहे. ३१ प्रवाशांना घेऊन पुण्याच्या वल्लभनगरहून चिंचवड- तासगाव ही बस मार्गस्थ झाली होती. मात्र तासगावच्या अलीकडेच असणाऱ्या येळावी येथे अचानकपणे एक दुचाकीस्वार एसटीच्या समोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली उतरली. बसचा वेग अधिक असल्याने लागलीच थांबविणे चालकाला शक्य झाले नसल्याने एसटी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या दिशेने गेली.

      मात्र मागील चाक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चरीत अडकल्याने समोर पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कठड्याजवळ जाऊन बस थांबली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान अपघातग्रस्त बसमध्ये ३१ प्रवासी होते. या अपघातात चालकासह १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्याला मुका मार लागला आहे. सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले आहे. तसेच विहिरीच्या कठड्याजवळ बस अडकल्याने बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!