जयकर ज्ञानस्रोत केंद्रामध्ये भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्रोत केंद्राने दि. ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे दि. ४ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. कुलगुरू यांनी ग्रंथप्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन प्रदर्शनात उत्तम ग्रंथांचा समावेश असल्याचे नमूद करुन विद्यापीठातील सर्व विद्यार्थी, संशोधक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन केले. उद्घाटन प्रसंगी विद्यापीठातील विभागप्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनामध्ये देशभरातील ४० हून अधिक ग्रंथविक्रेते आणि प्रकाशक यांचा सहभाग असून देश-विदेशात प्रकाशित झालेल्या विविध विषयांवरील सन २०२२ नंतर प्रकाशित झालेल्या असंख्य नवीनतम ग्रंथांचा समावेश आहे. दि. ४ ते ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या वाचनकक्षामध्ये हे ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. विविध विषयांवरील ग्रंथ पाहण्याची आणि आपले ज्ञान समृद्ध करण्याची ही एक अनोखी संधी असून या संधीचा सर्व अभ्यासक, संशोधक, वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जयकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. संजय देसले यांनी केले. विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक नेहमीच त्यांच्या विषयातील उत्तमोत्तम ग्रंथांची खरेदीसाठी शिफारस करुन जयकर ज्ञानस्रोत केंद्राचा ग्रंथसंग्रह आणखी समृद्ध करण्यात योगदान देत असतात. नेहमी प्रमाणे याही वेळी त्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे असे डॉ. संजय देसले यांनी सांगितले.
ग्रंथ प्रदर्शनास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, विद्यापीठाच्या कुलसचिव प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे, विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे सदस्य, प्रशाला संचालक, विभागप्रमुख, अध्यासनप्रमुख यांनी शुभेच्छा दिल्या. ग्रंथ प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये जयकर ज्ञानस्रोत केंद्रातील सर्व सेवकांनी हिरीरीने सहभाग घेतला.
