महत्त्वाच्या बातम्या

बिजवडी ग्रामस्थांना दमदाटी करत ठेकेदारकडून रस्त्याचे काम सुरु

      राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने ठेकेदाराच्या माध्यमातून दबाव दहशतीच्या मार्गाचा अवलंब करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई न देता दहिवडी-फलटण रस्त्यालगत दोन्ही बाजूने बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे.वास्तविक पहिलाच रस्ता शेतकऱ्यांच्या अजून नावावर आहे त्याची भरपाई मिळाली नाही.अन आता पुन्हा भूसंपादन केले जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी या कामाला विरोध करत योग्य ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून न्यायालयाकडे हरकती घेत ठिकठिकाणी कामे बंद पाडली आहेत. कामाच्या विरोधात आज बिजवडी, पांगरी, वडगाव, मोगराळे, दुधेबावी, भाडळी, झिरपवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी मा.जिल्हाधिकारी सो व माणच्या प्रशासनाला निवेदन दिले आहे.

         दहिवडी-फलटण हा रस्ता करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र.160 यांनी कामासाठी जमीन संपादीत करण्यासाठी हरकती मागवण्यात आल्या होत्या त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या होत्या मात्र अद्याप त्याचे निराकरण झालेले नाही. तरीही ठेकेदारामार्फत दहशत दाखवून रस्त्याचे काम सुरू केले आहे.मोठमोठ्या यंत्राच्या सहाय्याने रस्याचे दोन्ही बाजुने शेतकऱ्यांची पिके,गुरांचे गोठे, फळझाडे आदी पिकांचे नुकसान करुन सपाटीकरण चालले आहे.सदरच्या जमीनी या शेतकऱ्याच्या खाजगी मालकी वहिवाटीच्या असताना बेकायदेशीर व मनमानी करत कामे केली जात आहेत.

         सध्या अस्तित्वात असलेला दहिवडी फलटण रास्ता हा 18 फुट रुंदी चा बांधकाम विभागा मार्फत डांबरीकरण केलेला आहे.तो संपुर्ण रस्ता हा शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीच्या जमिनीतुन जात असुन सदर रस्त्याबाबत यापूर्वी कधीही राज्यशासन किंवा बांधकाम विभागाने रस्त्यासाठी भुसंपादन केलेले नाही.तसेच संपादन केलेबाबत कोणताही फेरफार तयार झालेला नसून तशी कोणतीही नोंद सातबारा किंवा इतर कोणत्याही कागदपत्रात आढळुन येत नाही.संपुर्ण क्षेत्र हे शेतकऱ्यांचे नावे असून बांधकाम विभाग किंवा महाराष्ट्र शासनाच्या नावे भोगवटदार सदरी किंवा इतर हक्कामध्ये कसलीही नोंद नाही. सर्व शेतकरी संपादन कायद्याप्रमाणे जमीनी संपादीत देण्यास कोणताही विरोध नसून त्यास ते सहकार्य करण्यास तयार आहेत.मात्र सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर संपादनाला व कामाला शेतकऱ्यांचा विरोध आहे.शेतकऱ्याच्या हरकतीचे निराकरण होवून योग्य ती नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय कोणतेही संपादन करण्यात येऊ नये यामागणीचे निवेदन बिजवडी,पांगरी, वडगाव, मोगराळे, दुधेबावी, भाडळी, झिरपवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिले आहे.याप्रसंगी विविध गावचे शेकडो शेतकरी उपस्थित होते. सदर निवेदन मा.जिल्हाधिकारी सो,मा.उपविभागीय अधिकारी सो,मा.तहसिलदार सो,मा.अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मा.सपोनि सो दहिवडी पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!