दहिवडीमध्ये अवैध खडी क्रशर विरोधात १४ ऑगस्ट पासून आमरण उपोषण
माण तालुक्यातील अवैध खडी क्रशर मालकांवर कारवाई होण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटोळे हे दहिवडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन महसूल विभागाला दिले आहे. माण तालुक्यामध्ये अवैध खडी क्रशर मालकांनी उच्छाद मांडला आहे. उत्खनन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना तालुक्यामध्ये ११ ठिकाणी अवैध क्रशरने लाखो ब्रास उत्खनन केले आहे. तालुक्यातील अनेक बांधकामांना या क्रशरच्या माध्यमातून भर दिवसा आणि रात्री खडी,खच, क्रश सेंड मोठ्या हायवा डंपरच्या माध्यमातून वाहतूक केले जाते. महसूलच्या लाखो ब्रास संपत्तीवर दरोडा टाकल्याप्रकरणी अवैध खडी क्रशर मालकावर दरोड्याचे गुन्हे दाखल करून. पंचनामा करून दंडात्मक कारवाई करावी व यंत्रसामग्री जप्त करण्यात यावी यासाठी सचिन पाटोळे हे १४ ऑगस्ट २०२५ पासून दहिवडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
