मलकापूरातील महिलेची तब्बल 26 लाखांची फसवणूक
मलकापूर मधील संगमनगर येथील एका महिलेला वर्क फ्रॉम होम च्या नावाखाली 26 लाख रुपयांना फसवले आहे. अरुणा कुंभार असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून एप्रिल ते मे महिन्यात एका महिलेने फोन वरून अरुणा यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर एका कंपनीचे सभासद होण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. मोबाईल वरून सोशलमीडियाच्या एका ग्रुप वर त्यांना जोडून घेतले व विविध ऍक्शन टास्क करण्यास सांगितले. वेगवेगळ्या प्रकारे पैशांचे आमिष दाखवून प्रत्येक प्रोडक्ट ला किंमत लावलेली लिंक पाठवून अरुणा यांना पैसे भरण्यास सांगितले. अरुणा यानी वेळोवेळी 25 लाख 82 हजार 111 रुपये रक्कम ऑनलाईन रित्या पाठवली. या महिलेने प्लॅटफॉर्म वर मोठा नफा दाखून अरुणा कुंभार यांचा विश्वास संपादन केला व वेगवेगळ्या खात्यावर पैसे जमा करून घेतले आणि अरुणा कुंभार यांच्याशी संपर्क तोडला. या प्रकरणात तीन जणांचा सहभाग असून कुंभार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
