पुणे-कोलाड महामार्गावर दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन अपघात
पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यातील चाचवली गावाजवळ सकाळी ९ वाजता दोन राज्य परिवहन बसेसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये किमान १२ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले , अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-कोलाड महामार्गावर मुळशी धरण भागातील चाचवली येथे हा भीषण अपघात झाला. अपघातातील बस ही श्रीवर्धनहून बीडला निघाली होती. त्या बसचे ब्रेक निकामी झाले होते. चालकाने ती रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न केला परंतु रायगड जिल्ह्यातील खेडकडे जाणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी पौड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे, पौडचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पौड ग्रामीण रूग्णालयात येऊन जखमीची विचारपूस केली. आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे यांनी जखमींना मदत केली.
