पुण्यातील आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार
पुणे: आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या तरुणावर काही जणांनी मिळून कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळ रोडवरील रामवाडी येथील अमर टेक पार्कजवळ ही घटना घडली. गुरुवारी पहाटे साडे तीन वाजता एका आयटी कर्मचाऱ्यावर तीन ते चार जणांनी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. या तरुणावर सध्या येरवडा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही असे झोनल डीसीपी सोमय मुंडे यांनी द फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.
काँग्रेस युथ विंगचे शहर प्रमुख राहुल शिरसाट यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अमर टेक पार्कमधील सुरक्षेबाबत वारंवार तक्रारी येत आहेत, ज्यामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या मुद्द्यावर कंपनी व्यवस्थापनाला अनेक तोंडी आणि लेखी निवेदने देण्यात आली होती, परंतु दुर्दैवाने, कोणतीही ठोस कारवाई किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
