महत्त्वाच्या बातम्या

वाघोलीत बिल्डरविरोधात शांततापूर्ण निदर्शनाची तयारी

    मजेस्टिक ओअॅसिस सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी बिल्डरविरोधात शांततापूर्ण निदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. वाघोलीतील गट क्रमांक २३ येथे वसलेल्या या सोसायटीतील रहिवाशांनी बेसमेंटमधील पाणी साचण्याच्या समस्येवर अनेक वेळा तक्रार करूनही बिल्डरने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप केला आहे. निदर्शनासाठी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता केसणंद फाटा येथे सुमारे ५० ते १०० सदस्य एकत्र येणार आहेत. रहिवाशांनी वाघोली पोलीस स्टेशनकडे परवानगीसाठी अधिकृत पत्र सादर केले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

       बेसमेंटमधील पाणी गळतीमुळे डासांची पैदास, ओलसरपणा आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय वाहने, विद्युत प्रणाली व इतर मालमत्तेचे नुकसान होत असल्याने आर्थिक नुकसानही होत आहे. रहिवाशांनी पुणे महानगरपालिका (PMC) आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्याकडेही तातडीच्या कारवाईसाठी पत्रव्यवहार केला आहे. सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांनी संयुक्तपणे ही मागणी केली असून, बिल्डरला तातडीने तांत्रिक उपाययोजना करण्यास भाग पाडावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. रहिवाशांच्या या आंदोलनाकडे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!