महत्त्वाच्या बातम्या

माण तालुका पुन्हा हादरला ! मार्डीनंतर पुळकोटीत वृद्ध महिलेचा निर्घृण खून

दहिवडी: माण तालुका पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला आहे. मार्डीतील खुनानंतर अवघ्या काही दिवसांतच पुळकोटी गावात एका वृद्ध महिलेची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येनंतर घटनास्थळावर मोठी गर्दी जमा झाली होती. शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी पुळकोटी गावात ही थरारक घटना घडली. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी तत्काळ परिसराला मोठा बंदोबस्त लावला.

      सातारा गुन्हे अन्वेषण विभाग, ठसे तज्ञ व श्वानपथक दाखल घटनास्थळी दाखल झाले आहेत. खुनाच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, ठसे तज्ञ व श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दहिवडी पोलीस स्टेशनचे ‘बेस्ट डिटेक्टर’ म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत.

      कपाळावर, गळ्यावर व चेहऱ्यावर गंभीर वार केले आहेत. मृत महिला सौ. सुलभा मारुती गलंडे (वय 65, रा. पुळकोटी) यांचा दुपारी 2.30 ते संध्याकाळी 6 या वेळेत खून करण्यात आला. अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने कपाळावर, गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला. इतकेच नव्हे तर खूनानंतर घटनास्थळी पडलेले रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

        याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा डॉ. संदेश मारुती गलंडे (रा. वडूज) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजि. नं. 299/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238 प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.  घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रंजित सावंत यांनी रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि दराडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. सध्या तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्याकडे असून अज्ञात आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!