महत्त्वाच्या बातम्या

शिरताव ग्रामपंचायत शिपाई रणजित चव्हाण यांचा ड्युटीवर मृत्यू : कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला

दहिवडी:  शिरताव (ता. माण) येथील ग्रामपंचायत शिपाई रणजित श्यामराव चव्हाण (वय ३४) यांचा ड्युटीवर असतानाच मृत्यू झाल्याने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० वाजता रणजित चव्हाण हे गावाला पाणी पुरवठा करणारा विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले होते. मात्र ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतले नाहीत. गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता त्यांचा मुलगा शोध घेण्यासाठी विहिरीजवळ गेला असता, पत्र्याच्या शेडमध्ये वडील मृतावस्थेत पडलेले आढळले. घाबरलेल्या मुलाने गावात माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले. म्हसवड पोलीस ठाण्यातून हवालदार पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरेश हांगे व पोलिस हेड कॉन्स्टेबल देवा खाडे पोलिस हवालदार निलेश कटपाळे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.

       मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शेडमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरिन पावडरचा प्रचंड वास पसरलेला होता. त्या वासामुळे रणजित यांचा मुलगाही आजारी पडला असून त्याला म्हसवड येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  रणजित चव्हाण हे आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होते. ते एकटेच कमावते होते. त्यांच्या अकाली जाण्याने आई, पत्नी व दोन लहान मुलांवर मोठे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला आधार द्यावा, अशी मागणी केली आहे. कुटुंबीयांचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. गावकऱ्यांनी या दुर्दैवी घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले असून रणजित यांच्या जाण्याने शिरताव गावावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे चित्र दिसत आहे.

         घटनास्थळी तहसीलदार विकास अहिरे , अप्पर तहसीलदार मिना बाबर , गटविकास अधिकारी प्रदीप शेडगे , सर्कल आकडमल गाव कामगार तलाठी माधुरी चव्हाण ग्रामसेवक सतिश आवटे यांनी भेट पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!