प्रशासनाचे साताऱ्यातील नागरिकांकडून कौतुक
बॉम्बे रेस्टॉरंट चौकात लाईट पाणी गटर यांच्या समस्या कायमच उद्भवत असतात. याचा फटका बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील वाहतुकीस मोठ्या प्रमाणात सोसावा लागतो.
बंदिस्त गटार असल्यामुळे सदर गटाराचे पाणी चौकामध्ये गोळा होऊन चौकास तळ्याचे स्वरूप येते. त्यामुळे वाहन चालकांना त्या पाण्यात असलेल्या मोठ्या खड्डयांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहन चालक त्या पाण्यामध्ये पडत होते. सातारा नगरपरिषद, जिल्हा परिषद ,नॅशनल हायवे अथोरिटी तसेच खेड ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती कोणीच या भागाची जबाबदारी घेत नसल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नव्हता. तसेच या चौकात सर्व पक्षांनी आपापल्या परीने आंदोलन करून शासनास जाग आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ढिम्म प्रशासनास कोणताच फरक न पडल्याने त्याचा त्रास सातारा शहर वाहतूक शाखेस कायम होत होता. त्यातच दिवाळीच्या सणामुळे वाहतुकीच्या कोंडीत प्रचंड प्रमाणात वाढ होत होती. ही समस्या लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे स पो नी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नी शहाजी राजगे, पोलीस हवालदार भगवान इंगुळकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत सुतार यांनी पुढाकार घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ठेकेदार न्याती ग्रुपचे साईट इनचार्ज मुल्ला व एम ॲन्ड टी ग्रुपचे मुजुमदार यांना सदर रस्त्याचे काँक्रीट करण्यास गळ घातली. सामाजिक भावनेतून या दोन्ही अधिकाऱ्यांनी तात्काळ होकार दिला व सदर काम पूर्णत्वास नेले.
नागरिकाच्या रोषाला कायम बळी पडत असलेल्या पोलीस प्रशासनाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
