महत्त्वाच्या बातम्या

श्वास असेपर्यंत माण-खटावच्या मातीची सेवा करणार – प्रभाकर देशमुख

दहिवडी: शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा वसा व वारसा घेऊन कायम वाटचाल करायची आहे. शिवरायांचा आदर्श आपल्या समोर आहे. यशवंतराव चव्हाण यांचा सकारात्मक राजकारणाचा, बेरजेच्या राजकारणाचा विचार आपण पुढे घेऊन जायचं आहे. माण-खटावच्या मातीची सेवा करण्यासाठी मी कायम कार्यरत राहणार आहे, थांबणार नाही. श्वास असेपर्यंत माण-खटावच्या मातीची सेवा करणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केले.

        लोधवडे (ता. माण) येथे आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील, बाळासाहेब रणपिसे व रमेश पाटोळे, खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप ऊर्फ पिंटूदादा मांडवे, साहेबराव देशमुख, माणचे माजी उपसभापती तानाजी कट्टे, बबनराव विरकर, बाळासाहेब काळे, सुरेंद्र मोरे, पृथ्वीराज गोडसे, पृथ्वीराज राजेमाने, जय राजेमाने, दिलीप तुपे, किशोर सोनवणे, डॉ. महेश माने, विक्रम शिंगाडे, महादेव मासाळ, सुर्याजीराव जगदाळे, हणमंत पाटील, सत्यवान कमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

        प्रभाकर देशमुख म्हणाले, शरद पवारांच्या रचनात्मक राजकारणाचा विचार माझ्या मनात कायम असणार आहे. सत्ता येते, जाते, पण आपण काम करत राहायचं. माण-खटावच्या मातीशी मी प्रामाणिक आहे. वाईट प्रवृत्ती विरुद्ध मी कायम लढत राहणार आहे. कोण कसा वागला याचा फार विचार करायचा नाही. चांगल्या लोकांना सोबत घेऊन भविष्यकाळात काम करत राहणार आहे. सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा मी निश्चित विचार करेन.

       संदीप मांडवे म्हणाले, रणांगणात गोंधळलेल्या सैनिकासारखी कार्यकर्त्यांची अवस्था झाली असून प्रभाकर देशमुख यांनी श्रीकृष्णाची भूमिका बजावून त्यांना योग्य प्रवाहात आणावे. दिलीप तुपे म्हणाले, प्रभाकर देशमुख यांच्यासाठी रक्ताची रंगपंचमी खेळायची आमची तयारी आहे. गद्दारांना शिक्षा दिलीच पाहिजे. प्रभाकर देशमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.

          किशोर सोनवणे म्हणाले, पिढी घडविण्याचे काम नेहमीच प्रभाकर देशमुख यांनी केले. लोकप्रतिनिधीने प्रभाकर देशमुख यांच्यावर बोलताना भान ठेवावे, कारण गाठ माझ्याशी आहे. प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. विक्रम शिंगाडे म्हणाले,जातीपातीत भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची एवढंच काम लोकप्रतिनिधीने केलंय. दादासाहेब मडके यांनी आपल्या प्रास्ताविकात खोट्या केसेस करुन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केला जातोय असे प्रतिपादन केले. प्रतिक भोसले यांनी सूत्रसंचालन केले. तर पृथ्वीराज गोडसे यांनी आभार मानले.

      माण तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजप मध्ये प्रवेश करत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले, नेते गेले तरी कार्यकर्ते जाग्यावर आहेत. ते ज्या कारणासाठी गेले ते त्यांना लखलाभ. परंतू त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. त्यांनी जात असताना आपल्या पदाचा राजीनामा देऊन जायला पाहिजे होतं. शरद पवार आपलं दैवत असलं तरी आता भविष्याचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांचं नेतृत्व स्वीकारुन, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रभाकर देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह यावं असं आवाहन पृथ्वीराज गोडसे, अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) सातारा जिल्हा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!