सोन्याची चोरी करणाऱ्या आरोपीकडून तब्बल सात लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत
पुण्यात सराईत चोरांचे प्रमाण वाढले असून अशीच एक घटना दिनांक सहा सप्टेंबर 2025 रोजी सुमारे 10.30 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. वेलकम चौक लक्ष्मी रोड कडे गणपती बघण्यासाठी निघालेल्या व्यक्तीच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याच्या साखळीत ओवलेले रुद्राक्ष अज्ञात चोरट्याने चोरून नेले अशी फिर्याद विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांनी सीसीटीव्ही पाहून संशयित आरोपीचा शोध घेतला. त्यावरून विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल भोसले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सदरचा गुन्हेगार परश्या उर्फ प्रशांत श्रीराम शिंदे (वय 22 वर्ष) राहणार लक्ष्मी माता मंदिराजवळ खुळेवाडी, पुणे यांनी केला आहे.
सदरची बातमी मिळतात आरोपीस ताब्यात घेण्यासाठी तपास पथकातील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर व पोलीस स्टाफ यांनी आरोपीच्या राहत्या घराचा शोध घेतला. आरोपी हा नमूद पत्त्यावर राहत असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत अधिक तपास केला असता आरोपीने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच तपासा दरम्यान विश्रामबाग पोलीस स्टेशनकडे इतर एकूण सात गुन्हे उघडकीस आले. आरोपीने त्याच्या घराजवळ राहणाऱ्या त्याच्या साथीदाराकडे सदरच्या गुन्ह्यातील मुद्देमाल दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याकडून एकूण सात गुन्ह्यातील 70.37 ग्रॅम वजनाचे एकूण 7 लाख 11 हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेगवेगळे दागिने जप्त करण्यात आले.
ही कारवाई माननीय अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, राजेश बनसोडे व पोलीस उपायुक्त परिमंडळ 01 पुणे शहर, कृषिकेश रावळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर, साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलिस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, सचिन हिवळे, शैलेश सुर्वे, अमोल भोसले, आशिष खरात, सागर मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, अर्जुन थोरात, नितीन बाबर, राहुल माळी, महिला पोलीस अंमलदार पठारे यांनी केली.
