सातारा गॅझेटिअर लागू झालंच पाहिजे….मागणीसाठी सोहम शिर्के यांचे आमरण उपोषण; चौथ्या दिवशी उपोषण सुरूच
दहिवडी: सातारा गॅझेटीयर लागू झालंच पाहिजे या प्रमुख मागणीसह १७ मागण्यासाठी मराठा सेवक सोहम शिर्के हे येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य न झाल्याने आज चौथ्या दिवशी उपोषण सुरूच होते. या मागण्यांमध्ये सातारा गॅझेटीयर लागू करुन मराठा आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी. कुणबी जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन प्रणाली लागू करावी यासह आरोग्य, शिक्षण, महिला, युवक, कृषी, पशुसंवर्धन, क्रीडा, उद्योग, मुलभूत सुविधा, अवकाळी नुकसान भरपाई, माहितीचा अधिकार या विषयांच्या अनुषंगाने मागण्या करण्यात आल्या आहेत. उपोषणकर्ते सोहम शिर्के यांनी सुरू केलेल्या या आमरण उपोषणाला जनतेचा व सामाजिक संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप शेंडगे यांच्यासह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते सोहम शिर्के यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी आपापल्या खात्याअंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्तरावरील मागण्यांची पूर्तता करणार असल्याबाबतचे लेखी पत्र उपोषणकर्ते सोहम शिर्के यांना द्यावे असे निर्देश तहसीलदार विकास अहिर यांनी स्थानिक खातेप्रमुखांना दिले. तसेच वरिष्ठांशी संपर्क साधून दिला.उद्या उपोषणाचा पाचवा दिवस असून उपोषणाला पाठिंबा वाढत आहे.
“आमच्या काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी सातारा गॅझेटीयर लागू झालंच पाहिजे या मागणीसंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही.” सोहम शिर्के उपोषणकर्ते
