मुंबई वांद्रे टर्मिनस चेंगराचेंगरीत 9 जखमी तर 2 जणांची प्रकृती चिंताजनक
मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथून मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे 5:30 च्या सुमारास चेंगराचेंगरी ची घटना घडली. त्यामध्ये 9 प्रवासी जखमी झाले असून दोन प्रवाशांची स्थिती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर पहाटे गोरखपूर एक्सप्रेस आली असता प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली असे सांगण्यात येत आहे.या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये 9 प्रवासी जखमी झाले आहेत.घटनेनंतर जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी सात जणांची प्रकृती स्थिर असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. गर्दीचे कारण शोधण्यासाठी तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रोटोकॉलचे मूल्यांकन करण्यासाठी पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या प्रवाशांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नूर मोहम्मद शेख (वय 18)आणि इंद्रजीत सहानी (वय 19) यांची प्रकृती चिंताजनक आहे.
