विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमा निमित्त ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी पुण्यात मोठे वाहतूक बदल; जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी
पुणे: कोरेगाव भिमा, पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी २०२६ रोजी राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे शहराची वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलीस वाहतूक शाखेने ३१ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून ते १ जानेवारी २०२६ च्या रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल करण्याचे आदेश दिले आहेत.पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून हे आदेश निर्गमित केले आहेत.
महत्त्वाचे वाहतूक बदल आणि निर्बंध
कार्यक्रमाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल (अत्यावश्यक सेवा वगळून):
नगर रोड: खराडी बायपास ते लोणीकंद आणि पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व प्रकारचे प्रवेश बंद राहतील.
इतर बंद मार्ग: मरकळ नदी ब्रिज ते तुळापूर फाटा आणि वाघोली-केसनंद फाटा ते लोणीकंद (थेऊर फाटा) दरम्यानची वाहतूक बंद असेल.
जड वाहने: आळंदी-मरकळ रोडवरील मरकळ ब्रिज हा जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून, तेथून केवळ हलकी चारचाकी वाहनेच जाऊ शकतील.
बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या अनुयायांसाठी मार्ग
प्रशासनाने विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी विशिष्ट मार्ग आणि पार्किंगची सोय केली आहे:
मुंबई/ठाणे: तळेगाव दाभाडे – चाकण – शिक्रापूर मार्गे किंवा येरवडा-खराडी बायपास मार्गे ‘आपले घर’ पार्किंग.
छत्रपती संभाजीनगर/अहिल्यानगर: शिरूर-शिक्रापूर मार्गे.
सोलापूर/लातूर: केडगाव चौफुला – यवत – थेऊर फाटा मार्गे खंडोबा माळ पार्किंग.
सातारा/कोल्हापूर: कात्रज – खडी मशीन चौक – मंतरवाडी फाटा – थेऊर फाटा मार्गे पार्किंग.
सर्वसामान्य प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग
पुणे ते अहिल्यानगर (नगर रोड) कडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी खराडी बायपास, हडपसर, सोलापूर रोड, केडगाव चौफुला, न्हावरा आणि शिरूर या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
जड वाहनांना ‘नो-एंट्री’
३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड आणि अवजड वाहनांना (ट्रक, डंपर, मिक्सर, जेसीबी इ.) अंतर्गत वाहतुकीसाठी पूर्णपणे प्रवेशबंदी असेल. थेऊर फाटा, हॅरीश ब्रिज, नवले ब्रिज, कात्रज चौक आणि मंतरवाडी फाटा यांसारख्या शहराच्या महत्त्वाच्या प्रवेशद्वारांवरून ही वाहने आत येऊ शकणार नाहीत.नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि या बदलांची नोंद घेऊनच आपला प्रवास करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
