दहिवडी: आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित कीर्तनामध्ये पत्रकार लिंगराज साखरे यांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. या प्रकरणी वाढता रोष आणि कायदेशीर तक्रारीची दखल घेत, आयोजकांनी महाराजांच्या वतीने पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या वतीने ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आंधळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शासकीय कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार लिंगराज साखरे गेले असता, महाराजांच्या सूचनेवरून अभियानाचे बिभीषण मंगसुळकर पाटील व कार्यकर्त्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या अडवणुकीमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
पत्रकार संघटना आक्रमक
या घटनेचा निषेध म्हणून ‘माण तालुका पत्रकार संघाने’ दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी दत्तात्रय दराडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनीही या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. “शासकीय योजनेच्या कार्यक्रमात पत्रकारांचा अपमान करणाऱ्या इंदुरीकर महाराजांना या अभियानातून वगळण्यात यावे,” अशी आग्रही मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बातम्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.
पत्रकारांची एकजूट आणि वाढता दबाव पाहून, मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध ग्राम योजनेचे बिभीषण पाटील यांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी पत्रकार लिंगराज साखरे यांना फोन करून इंदुरीकर महाराजांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. आपल्याकडून चूक झाल्याचे कबूल करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
”लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारे अडवणूक करणे चुकीचे आहे. या माफीनाम्यामुळे पत्रकारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे.”
—माण पत्रकार संघ ,
आयोजकांनी माफी मागितली असली तरी, भविष्यात शासकीय कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळणार का? आणि इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून पत्रकारांबाबतची भूमिका बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.