महत्त्वाच्या बातम्या

पाण्याच्या टंचाईवर विद्यार्थ्यांचा संताप; पुणे विद्यापीठात ठिय्या आंदोलन

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. मागील सुमारे पंधरा दिवसांपासून कॅम्पसमध्ये पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होत नसल्याची तक्रार विद्यार्थी सातत्याने करत होते. मात्र, या तक्रारींकडे विद्यापीठ प्रशासनाने पुरेशी दखल घेतली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
        उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये पाण्यासाठी इकडून-तिकडे भटकावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत गेला. अखेर या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी National Students’ Congress आणि इतर समविचारी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
      विद्यार्थ्यांनी १९ एप्रिल रोजी विद्यापीठातील जयकर ग्रंथालय परिसरात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!