महत्त्वाच्या बातम्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फीवाढीविरोधात विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; प्रशासनाकडून आश्वासन

पुणे | प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या शुल्कात झालेल्या मोठ्या वाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन छेडले आहे. राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर या फीवाढीचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश शुल्कात करण्यात आलेली वाढ ही सर्वसामान्य आणि ग्रामीण कुटुंबांसाठी परवडणारी नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आधीच दुष्काळ आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातील पालकांसमोर मुलांचे उच्च शिक्षण हे मोठे आव्हान बनले आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी फीवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली असून, ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करावी, तसेच विद्यापीठातील क्रेडिट कोर्स ऐच्छिक (optional) करावेत, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

 

दरम्यान, कडक उन्हात सुरू असलेल्या उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. विद्यार्थी विकास अवचार, सिद्धांत जांभुळकर आणि राहुल गुडदे यांना चक्कर येऊन त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घेतली. परीक्षा विभागाचे संचालक प्रभाकर देसाई यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.विद्यार्थ्यांचे आंदोलन सध्या सुरूच असून, प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!