महत्त्वाच्या बातम्या

आरोग्य सेवांवर आता मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत थेट देखरेख – मंत्री प्रकाश आबिटक

कोल्हापूर:

 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती‘ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन उपक्रमांतर्गत राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाची पहिली तिमाही आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे संपन्न झाली. मंत्रालयापासून थेट ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे आणि सर्व सरकारी आरोग्य योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत सुलभ पद्धतीने पोहोचवणे हाच या समितीचा मुख्य उद्देश आहे. १ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा राज्यव्यापी भव्य शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिली.

या उच्चस्तरीय बैठकीमध्ये राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता, औषधसाठा, प्रयोगशाळा सुविधा, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीची पडताळणी करण्यात आली. पावसाळ्याचे दिवस असल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस आणि अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) आणि ‘आपला दवाखाना‘ या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतींची संख्या वाढवण्यासाठी व कर्करोग निदानासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.

आरोग्य सेवा ही शासनाची सर्वात महत्त्वाची लोककल्याणकारी सेवा असून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार उपचार मिळवून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे आबिटकर यांनी स्पष्ट केले. स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली या समित्यांची बैठक दर तीन महिन्यांनी होईल, ज्याचा आढावा पुढे पालकमंत्री आणि त्यानंतर स्वतः आरोग्यमंत्री स्तरावर घेतला जाईल. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, वेळेवर उपचार आणि पारदर्शक सेवा यावर विशेष भर देण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ही बैठक आरोग्य व्यवस्था अधिक उत्तरदायी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असून, बैठकीला जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!