महत्त्वाच्या बातम्या

आधी पर्यायी रस्ता द्या,मगच उड्डाणपुलाचे काम करा–केतन जाधव मा.चिटणीस भाजपा पुणे

पुणे:

केंद्र व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून देशभरात रस्ते, उड्डाणपूल आणि मेट्रोचे जाळे अत्यंत वेगाने विणले जात आहे. याच विकासकामांचा भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (NHAI) मार्फत वाघोली येथे उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल वाघोलीकरांनी सरकारचे आभार मानले आहेत. मात्र, हा मोठा विकास प्रकल्प सुरू करताना प्रशासनाने स्थानिक वाहतूक कोंडीचा प्रामुख्याने विचार करावा, अशी आग्रही मागणी आता समोर आली आहे. “आधी पायाभूत सुविधा, मग मोठे प्रकल्प” हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने आधी ‘आरपी‘ (RP) रस्ता पूर्ण करावा आणि त्यानंतरच उड्डाणपुलाचे काम हाती घ्यावे, अशी थेट मागणी भाजप पुणेचे माजी चिटणीस केतन भैय्या जाधव यांनी केली आहे.

गेल्या १५ वर्षांत वाघोली आणि परिसराची लोकसंख्या तब्बल पाच पटीने वाढली आहे. त्यामुळे सध्या वाघोली चौकात दररोज सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. केवळ चौकातून बाहेर पडण्यासाठी वाहनधारकांचे एक ते दीड तास वाया जात असून, थोडा जरी पाऊस झाला तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामध्ये शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिका अडकून पडत असल्याने नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे. अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत जर उड्डाणपूल आणि मेट्रोचे काम एकाच वेळी सुरू झाले आणि वाहतुकीसाठी कोणताही ठोस पर्यायी मार्ग उपलब्ध नसेल, तर वाघोलीकरांचे हाल अधिक वाढतील, अशी भीती केतन जाधव यांनी व्यक्त केली आहे.

वाघोलीकरांचा विकासाला कधीही विरोध नाही आणि येथील विकास शंभर टक्के झालाच पाहिजे, हीच सर्वांची भावना आहे. परंतु, कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता काम सुरू केल्यास संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल. त्यामुळे महायुती सरकार आणि संबंधित प्रशासनाने प्रथम वाघोली नगररोडसाठी ‘आरपी‘ रस्ता पूर्ण करून द्यावा, जेणेकरून वाहतुकीला एक सक्षम दुसरा पर्याय उपलब्ध होईल. हा पर्यायी मार्ग तयार झाल्यानंतर उड्डाणपूल आणि मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी नम्रपणे ठाम मागणी त्यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!