महत्त्वाच्या बातम्या

२३ वर्षांनंतर घेतला बापाच्या हत्येचा बदला! पुण्यातील कात्रज बोगद्याजवळील मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश

पुणे: पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ घडलेल्या एका सनसनाटी हत्याकांडातून प्रतिशोधाची अशी एक भयानक आणि थरारक कहाणी समोर आली आहे, ज्याने संपूर्ण पोलीस दल चक्रावून गेले आहे. अवघ्या सहा महिन्यांचा असताना बापाचे छत्र हरवलेल्या एका मुलाने तब्बल २३ वर्षांनंतर आपल्या वडिलांच्या मारेकऱ्याचा काटा काढत बदल्याचा प्रवास पूर्ण केला आहे. संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) असे या हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव असून, तो एका गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. ११ जुलै रोजी संजय जेलमधून बाहेर येताच, वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी टपून बसलेल्या या मुलाने आपल्या मित्रांच्या साथीने कात्रज बोगद्याच्या निर्जन परिसरात त्याला गाठले आणि अत्यंत निर्घृणपणे त्याचा गेम बजवला.

या घटनेनंतर राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र सुरुवातीला पोलिसांच्या हाती कोणताच सुगावा नव्हता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल टॉवर डंप डेटाचा कसून तपास सुरू केला. या तपासात मंथन वैद्य (वय २४) आणि सौरभ परदेशी यांची नावे समोर आली. पोलिसांनी सापळा रचून १४ जुलै रोजी या दोघांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच, त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबामुळे अधिकारीही हादरले. हे हत्याकांड तात्कालिक वादातून झाले नसून, यामागे २३ वर्षांचा जुना खूनी इतिहास दडला असल्याचे निष्पन्न झाले.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, सन २००३ मध्ये एका किरकोळ वादातून संजय कडू-देशमुख याने मंथनचे वडील दिनेश वैद्य यांची हत्या केली होती. त्या वेळी मंथन हा अवघ्या सहा महिन्यांचा बाळ होता. वडिलांचा चेहराही न पाहिलेल्या मंथनच्या मनात मोठे होताना फक्त आणि फक्त वडिलांच्या मारेकऱ्याबद्दलचा राग आणि नफरत धगधगत होती. संजय जामिनावर सुटल्याची माहिती मिळताच मंथनने सौरभ परदेशी, मीजान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला आणि कात्रज बोगद्याजवळ त्याला घेरून संपवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माचले यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी मंथनसह सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!