Ashadhi Ekadashi 2026: वाळूजच्या ‘प्रति पंढरपूर’ यात्रेसाठी वाहतुकीत मोठे बदल! २ दिवस ‘हे’ रस्ते राहणार बंद
वाळूज (छत्रपती संभाजीनगर): आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर वाळूज येथील प्रसिद्ध ‘प्रति पंढरपूर‘ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची आणि शेकडो दिंड्यांची अलोट गर्दी होणार आहे. महामार्गावर होणारी प्रचंड वर्दळ, भाविकांची सुरक्षा आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. शुक्रवार, २४ जुलैच्या रात्री ८ वाजेपासून ते शनिवार, २५ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत या परिसरातील काही मुख्य रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तर काही मार्ग जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, एएस क्लब चौक ते कामगार चौक आणि तिरंगा चौक (ओयासिस) ते आंबेडकर चौक (एफडीसी कॉर्नर) दरम्यानचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहील. तसेच इसारवाडी फाटा ते कामगार चौक आणि नगरनाका ते एएस क्लब चौक दरम्यान जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्गांची आखणी केली आहे. त्यानुसार जालना व बीडकडून नगर आणि पुण्याकडे जाणारी जड व हलकी वाहने महानुभाव आश्रम चौक, कांचनवाडी, चित्तेगाव व बिडकीन मार्गे इसारवाडी फाट्यावरून पुढे पाठवली जातील. धुळ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना साजापूर फाटा, कांचनवाडी पुलाखालून पैठण रस्त्याने वळवण्यात आले आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर शहराकडून पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना नगरनाका, तिसगाव चौफुली, साजापूर किंवा मिटमिटा, एनआरबी चौक, रांजणगाव आणि कामगार चौक मार्गे प्रवास करावा लागेल. एसटी महामंडळाच्या बसेस आणि खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूक देखील महानुभाव आश्रम चौक ते इसारवाडी फाटा या पर्यायी मार्गानेच चालणार आहे. वाळूज एमआयडीसीतील उद्योग व स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
