मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनम वांगचुक राजघाटावर; महात्मा गांधींना आदरांजली वाहत व्यक्त केली कृतज्ञता”
नवी दिल्ली: दिल्लीमध्ये तब्बल २६ दिवस चाललेले उपोषण आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे मेदांता रुग्णालयात सुरू असलेले दीर्घ उपचारानंतर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सोमवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच वांगचुक यांनी आपल्या पत्नीसह थेट दिल्लीतील राजघाट गाठले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. जंतरमंतरवर दाखल होण्यापूर्वी स्वित्झर्लंडहून भारतात आल्यावर जसे त्यांनी सर्वप्रथम राजघाटाचे दर्शन घेतले होते, त्याचप्रमाणे उपचारांनंतर डिस्चार्ज मिळाल्यावरही त्यांनी पुन्हा एकदा बापूंच्या विचारांचे स्मरण करत सत्याग्रहाच्या मार्गाची महत्व अधोरेखित केली. उपचारादरम्यान देशभरातून प्रार्थना करणाऱ्या सर्व नागरिकांचे, डॉक्टरांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले असून, आपली प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली सुधारली असून शरीरात ताकद परत येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेदांता रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधताना सोनम वांगचुक यांनी कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावर भाष्य केले आणि सर्वांच्या एकजुटीमुळेच हे आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगितले. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीसाठी नसून देशातील तरुण पिढीच्या भविष्यासाठी आणि संपूर्ण व्यवस्था व परीक्षा प्रणालीमध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी होता, असे त्यांनी ठामपणे सांगितले. समाजातील सर्व स्तरांतील तरुण, वृद्ध आणि देशाच्या काना कोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी या मोहिमेत एकत्र येऊन जो सामूहिक आवाज उठवला, तीच या लोकशाही चळवळीची सर्वात मोठी ताकद ठरल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गाजत असलेल्या पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी गांधीजींच्या मार्गाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. बापूंचा सत्याग्रहाचा मार्ग शंभर वर्षांपूर्वी जितका समर्पक होता, तितकाच तो आजही प्रभावी आहे, असे सांगत कोणतेही सरकार थेट आंदोलकांचे ऐकले नाही तरी अखेर जनतेच्या मनापर्यंत पोहोचणाऱ्या या अहिंसक मार्गापुढे सरकारलाही लोकांचे ऐकावेच लागते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लडाखमध्ये यापूर्वी अनुभवलेला हा गांधीवादी मार्ग आता राष्ट्रीय स्तरावरही यशस्वी ठरल्याचे सांगत, भारतातील आणि जगातील नागरिकांनी आपल्या न्याय मागण्या मांडण्यासाठी महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गाचाच अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले आणि आपल्या संदेशाचा शेवट “जय हिंद,” “नमस्ते,” आणि “जुले” अशा शब्दांनी केला.
