पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; मार्केटयार्डमध्ये दोन भावांवर प्राणघातक वार
पुणे: पुणे शहरात दिवसेंदिवस डोके वर काढणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीमुळे आणि हाणामारी, खून व खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. असे असतानाच शहरात एकापाठोपाठ एक अशा दोन खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. पूर्ववैमनस्यातून मार्केटयार्ड परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे दोन सख्ख्या भावांवर जीवघेणा हल्ला करत त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करण्यात आले, तर दुसरीकडे हडपसर भागात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या टोळक्याने जाब विचारल्याच्या कारणावरून काका-पुतण्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून परिसरात दहशत माजवल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्हीप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पहिली घटना मार्केटयार्ड भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे घडली. आशुतोष नाना क्षीरसागर (वय २७) आणि ऋषीकेश नाना क्षीरसागर (वय २६, दोन्ही रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे तीक्ष्ण शस्त्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन सख्ख्या भावांची नावे आहेत. याप्रकरणी आशुतोषने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून आरमान समीर शेख (वय २५) आणि शाहरुख उर्फ कल्लू शेख (वय २७, दोन्ही रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष व ऋषीकेश यांच्या एका नातेवाईकाचे गेल्या २६ जुलै रोजी निधन झाले होते. त्यामुळे हे दोघे भाऊ अंत्यविधीच्या विधीसाठी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मार्केटयार्डातील डॉ. आंबेडकरनगर परिसरावरून जात होते. याच दरम्यान जुन्या वैमनस्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना अचानक रस्त्यात अडवले आणि त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने अचानक सपासप वार केले. या हल्ल्यात दोघे भाऊ गंभीर जखमी झाले असून, घटनेनंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या पसार झालेल्या आरोपींचा कसून शोध घेतला जात असून पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
