जम्मू-कश्मीर विधानसभेत कलम 370 वरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांमधे धक्काबुक्की
जम्मू-कश्मीर विधानसभेने राज्याचा विशेष दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला तर बीजेपी ने यास विरोध करत 2019 मध्ये जम्मू कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले होते. जम्मू कश्मीर विधानसभेचे अधिवेशन 4 नोव्हेंबर रोजी सुरू झाले होते. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत एक ठराव मंजूर करण्यात आला. ज्यात जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा स्थापित करण्याची मागणी करण्यात आली. 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेने एका ठरावाद्वारे जम्मू कश्मीर विषयी संबंधित कलम 370 रद्द करून राज्याचे दोन भाग केले व त्याला केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते.
जम्मू कश्मीरमधील जुनी परिस्थिती पूर्ववत करण्याची मागणी राज्यातील प्रादेशिक पक्षांनी पुन्हा केली आहे. उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी यांनी कलम 370 शी संबंधित प्रस्ताव मांडला होता. मात्र भाजपाच्या आमदारांनी त्याला कडाडून विरोध केला. या प्रस्तावाच्या निषेधार्थ भाजपाचे आमदार ‘5 ऑगस्ट जिंदाबाद’ आणि ‘जिथे मुखर्जींनी बलिदान दिले तो कश्मीर आमचा’ अशा घोषणा देत होते. जम्मू कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल असे आश्वासन केंद्र सरकार पहिल्याच पासून देत आहे. जम्मू कश्मीरमध्ये निवडणुका झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले. जम्मू कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश पूर्ण राज्य म्हणून बहाल होईल असे वाटत होते परंतु आज या प्रस्तावावरून विधानसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
सत्ताधारी व विरोधी भाजपाच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून जोरदार धक्काबुक्की केली. अधिवेशनात गोंधळ झाल्याने मार्शलना पाचरण करावे लागले व विधानसभेचे कामकाज तहकुब करावे लागले. लंगेट चे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 चा बॅनर सभागृहात फडकवला या बॅनरवर असे लिहिले होते की, आम्हाला कलम 370आणि 35 A पुनर्स्थापित करायचे आहे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका हवी आहे. बॅनर फडकवणारे आमदार खुर्शीद अहमद हे बारामुल्लाचे लोकसभा खासदार इंजिनियर रशीद यांचे भाऊ आहेत. रशीद यांना 2016 मध्ये UAPA अंतर्गत जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी फंडिंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. ते 2019 पासून तिहार तुरुंगात बंद आहेत. खुर्शीद अहमद शेख यांनी बॅनर फडकवल्यानंतर विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी बॅनर दाखवण्यास विरोध केला यावरून आमदारांमध्ये बाचाबाची झाली. या गदारोळात 3 आमदार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
