महत्त्वाच्या बातम्या

महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली: देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महिला कुस्तीपट्टूंच्या बहुचर्चित लैंगिक छळ प्रकरणातून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची राउज अव्हेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सोमवारी दिल्लीतील विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा अंतिम निकाल सुनावत सबळ पुराव्याअभावी बृजभूषण सिंह यांना सर्व आरोपांतून दोषमुक्त केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते या प्रकरणी जामीनावर बाहेर होते, या न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.

जानेवारी २०२३ मध्ये देशातील दिग्गज महिला कुस्तीपट्टूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर एकत्र येत कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत मोठे आंदोलन उभारले होते. या प्रकरणी कुस्तीपट्टूंनी बृजभूषण सिंह यांच्यासह विनोद तोमर यांच्यावरही आरोप केले होते. या प्रकरणातील पोक्सो (POCSO) अंतर्गत दाखल असलेला गुन्हा याआधीच रद्द ठरवण्यात आला होता.

या संपूर्ण खटल्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३ ऑगस्ट २०२६ रोजी दिल्लीच्या राउज अव्हेन्यू कोर्टाने आपला अंतिम निकाल दिला. न्यायालयाने म्हटले की, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे बृजभूषण सिंह यांच्याविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुराव्याचा अभाव आहे. त्यामुळे त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.

न्यायालयाच्या या निकालानंतर प्रतिक्रिया देताना माजी खासदार बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, “मी सुरुवातीपासून जे बोलत होतो, तेच आज न्यायालयात सिद्ध झाले आहे. तक्रार दारांच्या जबाबात आणि पुराव्यांमध्ये सुरुवातीपासूनच विरोधाभास होता, हीच गोष्ट मी वारंवार सांगत होतो. आता मी न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहे.”

बृजभूषण शरण सिंह हे भाजपचे दिग्गज नेते असून ते सलग सहा वेळा खासदार राहिले आहेत. तसेच ते भारतीय कुस्ती महासंघाचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर निर्माण झालेल्या वादानंतर आणि गंभीर आरोपानंतर भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे तिकीट कापले होते. त्यांच्याऐवजी कैसरगंज मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र करण भूषण सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते, आणि ते विजयी झाले होते. आता न्यायालयाच्या या क्लिन चिटमुळे बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला असून राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!