मुंबई उपनगरातील विकास कामांना वेग; आशिष शेलारांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई: मुंबई उपनगर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (DPDC) माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांना अधिक गती देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सक्त सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्यात. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुरू असलेली विकासकामे आणि जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदींचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, कामांची प्रत्यक्ष प्रगती आणि निधीच्या उपलब्धतेचा सखोल आढावा घेण्यात आला.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ अंतर्गत प्रस्तावित तसेच सध्या प्रगतिपथावर असलेल्या विविध विकास कामांचा संक्षिप्त अहवाल सादर करण्यात आला. संबंधित सर्व विभागांनी मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तातडीने आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी, तसेच कामांच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या सर्व अडचणी परस्पर समन्वयाने दूर कराव्यात, असे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.
तसेच, जिल्ह्यातील विकासकामांसाठी शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा अत्यंत प्रभावी आणि नियोजनबद्ध वापर करावा, जेणेकरून नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त व प्रत्यक्ष लाभ मिळू शकेल, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. कोणतीही मंजूर विकासकामे अनावश्यक प्रलंबित राहणार नाहीत आणि सरकारी निधीचा योग्य व वेळेत विनियोग होईल, यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी उत्तम समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहनही पालकमंत्री आशिष शेलार यांनी या बैठकीत केले.
