राज्यात पुढील तीन दिवस अलर्ट जारी….थंडीच्या लाटे बरोबर पावसाची शक्यता
ऑक्टोबर हिटचे चटके सोसल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून हवामानातील बदल्यामुळे सगळ्यांच्याच जीवनावर परिणाम झालेला दिसून आला. मुंबईत आता पहाटे थंडीचा आल्हाददायक अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे आणि रात्री काही प्रमाणात गारवा जाणवायला लागला आहे. परंतु दुपारी कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तसेच हवेतील आद्रतेचे प्रमाण देखील कमी होत आहे. पश्चिम बंगाल आणि चेन्नईकडे सायकलोनिक सर्क्युलेशनशन मुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस अलर्ट देण्यात आला आहे. त्याचा परिणाम किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये दिसत आहे. 14 व 15 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर त्यानंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाट माथ्यावर देखील 14- 15 नोव्हेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.लातूर, धाराशिव, सोलापूर मध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल व सांगलीतही दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवसभर जाणवणारी उष्णता आणि रात्री पडणारा गारवा अशा वातावरणातील बदलामुळे कोल्हापूर घाट माथ्यावर आज आणि उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
