पुण्यात तिरंगा रॅलीवरून राजकारण तापले; २० हजार वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा अमोल बालवडकरांचा दावा
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी तिरंगा रॅलीवरून शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या रॅलीस तीव्र विरोध दर्शवत भाजपच्या नियोजनावर कडक शब्दांत संताप व्यक्त केला आहे. पुण्यात आधीच वाहतूक कोंडीची समस्या अतिशय बिकट असताना, १५ ते २० हजार दुचाकी रस्त्यावर आणून कसली राष्ट्रभक्ती दाखवत आहात? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
अमोल बालवडकर यांनी आपल्या आक्रमक भूमिकेत म्हटले आहे की, जगातील सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहर सध्या पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे. अशा बिकट परिस्थितीत शहरातील प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्याला ५० ते १०० दुचाकी आणण्याचे टार्गेट देऊन हजारो गाड्या रस्त्यावर उतरवणे म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्या सारखे आहे. एकाच वेळी १५ ते २० हजार दुचाकी रस्त्यावर आल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी व वायू प्रदूषण होईल, तसेच मोठ्या प्रमाणात इंधनाचा अपव्यय होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नेहमीच इंधन बचतीचे आवाहन केले असताना, स्थानिक भाजप नेते मात्र हजारो गाड्यांचा लांबच लांब ताफा रस्त्यावर उतरवून विनाकारण प्रदूषण वाढवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या नियोजित रॅलीमुळे रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक जाम होऊन आपत्कालीन परिस्थितीत धावणाऱ्या रुग्णवाहिका, रुग्ण, महिला आणि रोज कामानिमित्त बाहेर पडणारा नोकरदार वर्ग मोठ्या अडचणीत सापडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
केवळ वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत आपली ताकद दाखवण्यासाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सामान्य पुणेकरांना वेठीस धरू नका, असा ठाम दम देत बालवडकर यांनी भाजपला काही विधायक पर्यायी उपक्रमांची सूचना केली आहे. जर खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा करायची असेल, तर दुचाकी रॅली काढण्याऐवजी शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवा, रक्तदान शिबिरे आयोजित करा किंवा स्वच्छता अभियान राबवा, असे सुचवले आहे. जर भाजपने हा नियोजनशून्य हट्ट आणि रॅलीचा निर्णय रद्द केला नाही, तर आगामी काळात त्रस्त झालेले पुणेकर नागरिक स्वतःच्या पद्धतीने या प्रचंड वाहतूक कोंडीचा जाब भाजपला विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा गंभीर इशाराही नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे.
